लोकप्रिय पोस्ट

हल्ले आणि षडयंत्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
हल्ले आणि षडयंत्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ३१ मार्च, २०२२

हल्ले आणि षडयंत्र

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानासमोर भाजपच्या काही कार्यकर्त्यानीं निदर्शने करण्याचा प्रकार घडला. काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरून अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानासमोर निदर्शने करण्यासाठी आलेले भाजपा नेते तेजस्वी सूर्या यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तेजस्वी सूर्या आणि तेजिंदर पाल सिंग बग्गा यांच्यासह भाजपा कार्यकर्ते आंदोलन करण्यासाठी तेथे पोहोचले होते. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला.यावरून आम आदमी पक्षाने भाजपवर निशाणा साधला आहे. अमित शाह यांनी तोडफोडीचे आदेश दिले होते का?, असे आप नेत्या आतिशी यांनी म्हटले आहे. खासदार सूर्या पोलीस बसच्या छतावर चढले होते. आंदोलनादरम्यान केजरीवाल यांच्या घराच्या गेटलाही भगवा रंग देण्यात आला होता. याबाबत भाजपा खासदार तेजस्वी सूर्या यांनी म्हटले की, त्यांना केजरीवाल यांना काश्मिरी पंडितांसोबत कसा नरसंहार झाला याची आठवण करून द्यायची होती. त्यामुळे ते रस्त्यावर उतरले आहेत. केजरीवाल यांनी काही दिवसांपुर्वी म्हटले होते की, द कश्मिर फाईल्स हा चित्रपट यू ट्यूबवर प्रदर्शित करावा. तसेच या चित्रपटाचे उत्पन्न पिडित काश्मिरी पंडितांना द्यावे. यामुळे भाजपची मंडळी संतप्त झाली होती. केजरीवाल यांच्या निवासस्थानासमोरील निदर्शनादरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोडही केली. याबाबत आप नेते राघव चढ्ढा यांनी म्हटले की, पंजाबमधील पराभवानंतर भाजपाला धक्का बसला आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या निवासस्थानावर भाजपाच्या गुंडांनी केलेला हल्ला अत्यंत निषेधार्ह आहे. पोलिसांच्या उपस्थितीत या गुंडांनी बॅरिकेड्स तोडले, सीसीटीव्ही कॅमेरे तोडले. पंजाबच्या पराभवाच्या रागात भाजपा अशा बेगडी राजकारणावर घसरला आहे. आरोप- प्रत्यारोप बाजुला ठेवून विचार केला तर असे दिसते की, केजरीवाल यांना पंजाबमध्ये मिळालेले प्रचंड बहुमत पाहून भाजपवाले हैराण झाले आहेत. तसेच केजरीवाल यांची द कश्मिर फाईल्सवरील टिपणी भाजपवाल्यांना पसंत नाही. असो. देशात सहिष्णूता राहिलेली नाही. सदर चित्रपटाचा विषय महागाईपेक्षा मोठा झाला आहे. केंद्रात भाजपची सत्त्ता असल्याने भाजपची मंडळी बेभान झाली आहेत, असेच दिसते. केंद्रातील भाजपच्या नेत्यांमध्ये स्पर्धा सुरु आहे की, भाजप नेतृत्वाला कशाप्रकारे खुष करता येईल. भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या पोलीस बसच्या छतावर, तेही पोलिसांदेखत कसे चढले ? आंदोलनादरम्यान केजरीवाल यांच्या घराच्या गेटलाही भगवा रंग देण्यात आला होता. केजरीवाल यांना काश्मिरी पंडितांसोबत कसा नरसंहार झाला याची आठवण करून द्यायची होती, असे तेजस्वी सूर्या म्हटले आहे. या निदर्शनादरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोडही केली. पोलिसांनी भाजपवाल्यांना रोखले नाही, हे विशेष ! भाजपच्या खासदारांची ही गुंडगिरी कशासाठी ? मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गोंधळ करून भाजपने काय साध्य केले ? पंजाबमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेससोबतच भाजपाला देखील यश मिळवता आले नाही. या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाने जोरदार मुसंडी मारत पंजाबमध्ये एकहाती सत्ता स्थापन केली. त्यामुळे भाजपा आणि आपमध्ये जोरदार सुंदोपसुंदी सुरू झाली असताना आता आपकडून अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. अरविंद केजरीवाल यांच्या घरासमोर भाजपाकडून जोरदार निदर्शने करण्यात आली. या पार्श्वभूमीवर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी अरविंद केजरीवाल यांच्या हत्येच्या कटाचा गंभीर आरोप केला आहे. केजरीवाल यांना दहशत बसवावी, हा भाजपचा हेतू असल्याचे दिसत आहे. देशात जे विरोधक पुढे जात आहेत, त्यांच्यावर दहशतीचे प्रयोग केले जात आहेत. भाजपचे नेते आणि कार्यकर्ते या गोष्टीला आता सरावले आहेत. त्याना केंद्रीय यंत्रणेकडून पाठबळ दिले जात आहे. गैर भाजप शासित राज्यांमध्ये केंद्र सरकार कोणतीही मदत करीत नाही. त्यावरून केंद्र सरकार आणि अशा राज्यांतील राज्य सरकारचा खटका उडत आहे. साहजिकच स्थानिक भाजप नेत्यांना गैर भाजप शासित राज्यांतील सरकारविरोधात चेतवले जात आहे. हे षडयंत्र भाजपकडून देशात सुरू आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरासमोर झालेला प्रकार हा पूर्वनियोजित कटच होता, असा दावा मनीष सिसोदिया यांनी केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, पोलिसांच्या उपस्थितीत भाजपाचे गुंड अरविंद केजरीवाल यांच्या घरी नेण्यात आले. त्यांच्या घरचे सीसीटीव्ही फोडले गेले. त्यांचे बूम बॅरिअर तोडण्यात आले. हे सगळे भाजपाच्या गुंडांनी पोलिसांच्या उपस्थितीत केले. हा पूर्वनियोजित कट रचून अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्यात आला. मी भाजपाला म्हणतो की अरविंद केजरीवाल यांना हात लावण्याचा प्रयत्न करू नका. अशा प्रकारे हल्ला करून त्यांची हत्या करण्याचा कट देश सहन करणार नाही, असे देखील सिसोदिया यांनी म्हटले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी गेली सात वर्षे देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांच्या कारकिर्दीत असे प्रकार वाढले आहेत, हे दु:खद आहे. महाराष्ट्रात स्थानिक भाजप नेते राज्य सरकारवर दररोज वाट्टेल ते आरोप करतात. काही नेते तर एवढे सरावले आहेत की, या आठवड्यात सरकार कोसळणार, त्या आठवड्यात सरकार कोसळणार असे वेड्यासारखे भविष्यवाणी करताना दिसत आहेत. महाराष्ट्रात इडीचे भय दाखवून राज्य सरकारला निष्प्रभ करण्याचे उद्योग सुरू आहेत. केजरीवाल यांच्या निवासस्थानी हल्ला करणारा भाजपचा खासदार तेजस्वी सूर्या आणि तेजिंदर पाल सिंग बग्गा यांच्यासह गोंधळी भाजपा कार्यकर्ते यांना कडक शिक्षा होणे गरजेचे आहे. अन्यथा अशी बिनडोक मंडळी झुंडीने काहीही करतील. केंद्र सरकारने दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या विरोधात यापुर्वी अनेक कारस्थाने केली आहेत. कारस्थाने करणे भाजपचे धोरण बनले आहे. गैर भाजपशासित पक्षांच्या राज्य सरकारांनी वेळीच शहाणे होऊन एकत्र येत अशा कारस्थानांचा पर्दाफाश करणे गरजेचे आहे.

लढवय्ये बाबा

लढवय्ये बाबा