लोकप्रिय पोस्ट

मंगळवार, २२ फेब्रुवारी, २०२२

जागतिक तापमानवाढ : धोक्याचा इशारा

ब्लॉगर : अशोक सुतार / ८६००३१६७९८
तापमान वाढ ही जागतिक समस्या निर्माण झाली असून यामुळे अवेळी पाऊस, गारपीट, दुष्काळ, ढगफुटी इत्यादी घटना वारंवार पाहावयास मिळत आहेत. तापमान वाढीवर वेळीच नियंत्रण मिळविले नाही तर भविष्यांत गंभीर प्रश्न निर्माण होणार आहेत. वाहतुकीची साधने कमी प्रमाणात वापरणे किंबहूना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे, इलेक्ट्रिकल वाहने वापरणे, सोलर एनर्जी वापरणे, गोबर गॅसचा वापर करणे, जल व वायू प्रदूषण होणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे मत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सातारा जिल्ह्यातील वाई येथे नुकतेच व्यक्त केले आहे. ना. आदित्य ठाकरे हे पर्यावरणाबाबत संवेदनशील आहेत. त्यांनी पर्यावरण मंत्रालयाची जबाबदारी खांद्यावर घेतल्यापासून अनेक धाडसी निर्णय घेतले आहेत. मुंबईलगत आरे जंगलातील झाडांच्या कतलीचा विषय त्यांनी योग्य प्रकारे हाताळला. आदित्य ठाकरे यांच्या निर्णयामुळे हजारो झाडे वाचली. विकासाच्या नावावर झाडांच्या कतली होणे हे चिंताजनक आहे. केंद्र सरकार व भाजपचे नेते विकासासाठी कोणत्याही थरावर जातील. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करण्यास सुरुवात झाली. पर्यावरणाची केंद्र सरकारला चिंता दिसत नाही. ते भान महाराष्ट्र सरकारने दाखवले आहे. ना आदित्य ठाकरे यांनी पर्यावारांचा नाश झाला तर किती गंभीर परिस्थिती आहे, याबद्दल भाष्य केले आहे. निमित्त होते, सातारा जिल्हा बँक व दि इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब्ज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्लोबल वॉर्मिग -ग्लोबल वॉर्निग परिसंवादाचे ! या परिसंवादाचे उद्घाटन पर्यावरण मंत्री ठाकरे यांच्या हस्ते झाले. जगभरातील शास्त्रज्ञांनी तापमान वाढीबाबत सातत्याने इशारे दिले आहेत. परंतु जगभरातील अनेक देशांची सरकारे त्या इशाऱ्यांना जुमानत नाहीत, असेच दिसते. परिणामी पृथ्वीचा विनाश अटळ आहे. सध्या जगाला हवामान बदलाला सामोरे जावे लागत आहे. याचबरोबर डेंग्यु, झिकासारखे जुने-सुप्त व्हायरस पुन्हा परतण्याचा युरोपला धोका असल्याचा इशारा संशोधकांनी दिला आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे म्हणजेच जागतिक तापमानवाढीमुळे हे व्हायरस, त्यामुळे होणारे रोग गंभीर बनत चालले आहेत. कोरोनाने जगावर मोठे संकट आणले. यामुळे आजवर सुमारे ८ लाख लोकांना प्राणाला मुकावे लागले आहे. जंगलावर मानवी अतिक्रमणामुळे हे सारे घडत आहे, असा अशारा संशोधकांनी दिला आहे. परिणामी कोरोनासारखीच अन्य मोठी संकटे भवितव्यात ओढवणार आहेत. जगाच्या तापमानात १ डिग्री सेल्सिअसची वाढ झाली आहे. यामुळे ही तापमानवाढ मलेरिया, डेंग्यूसारख्या रोगांची वाहक बनली आहे. देवी, शीतज्वरासारखे उत्पात माजविलेले व्हायरस पुन्हा परतण्याचा धोका असल्याचे म्हटले आहे. एकूण जागतिक तापमान वाढ रोखण्याचे आव्हान जगासमोर आहे. हवामान बदलाचा हा टाईम बॉम्ब रशिया, कॅनडा आणि अलास्काच्या भागात पसरू लागला आहे. कारण या भागात जगात जेव्हा औद्योगिकीकरणाचा उगम झाला तेव्हापासून तिप्पट कार्बन उत्सर्जन झाले आहे. जर मनुष्यवस्तीने २०१५ च्या पॅरिस करारानुसार तापमान दोन डिग्री सेल्सिअसने कमी केले तर या ध्रुव प्रदेशातील उघडी पडलेली जमीन २१०० पर्यंत पुन्हा बर्फाच्छादीत होईल असे युएनच्या हवामान पॅनेलने म्हटले आहे. हवामान बदलाचे दृश्य परिणाम जगातील काही ठिकाणी स्पष्टपणे दिसून येवू लागले आहेत. जिथे वाळवंट आणि सदोदित तापमान ५५ अंश सेल्सियसवर असते, अशा अल्जेरियाच्या सहारा वाळवंट येथे पाच वर्षांपूर्वी बर्फ पडले होते. जगाच्या अतिशय गरम भागात बर्फवृष्टी होणे हा साधासुधा योग नाही, वर्षानुवर्षे घडणाऱ्या हवामान बदलाचा एक भाग आहे. आताही भारतात असेच विचित्र तापमान दिसू लागले आहे. केव्हाही पाउस येणे, थंडी वाढणे, बर्फ पडणे असे प्रकार होऊ लागले आहेत. हवामान बदलाच्या घटनांपासून बचाव करण्यासाठी जगातील प्रमुख देशांनी एकत्र येवून ठोस कार्यक्रम आखला पाहिजे, असे वाटते. बदलत्या वातावरणासाठी विकास आराखडा तयार करणे आवश्यक आहे. सरकारने असे प्रयत्न केले तर तापमानवाढ रोखली जाईल. पृथ्वीवर कार्बनचे उत्सर्जन रोखणे व नंतर ते खालच्या पातळीवर आणण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. २०२५ पर्यंत पृथ्वीवरील विकसित देशांनी १९९० च्या कार्बन उत्सर्जनाच्या पातळीमध्ये किमान ४० टक्के कपात करणे आवश्यक आहे. विकसित देशांनी २०२५ पर्यंत औदयोगिक राष्ट्रांच्या सहकार्याने हे प्रमाण कमी केले पाहिजे. उष्णकटिबंधीय जंगलांना विशिष्ट निधी, तंत्रासह संरक्षित करणे म्हणजेच हवामानासाठी वन ही संकल्पना प्रत्यक्षात राबविणे. दूषित जीवाश्म इंधन निर्मिती केलेल्या उर्जेंऐवजी नवीकरणीय ऊर्जा आणि ऊर्जेची कार्यक्षमता वाढवणे हे त्यावरचे उपाय आहेत. अणुऊर्जासारख्या उपाययोजना नाकारणे आता काळाची गरज बनणार आहे. डब्ल्यूडब्ल्यूएफच्या अहवालात, शास्त्रज्ञ स्पष्ट इशारा देतात की- वर्ष २०५० पर्यंत, ही पृथ्वी आपल्यासाठी निरुपयोगी ठरेल. या अहवालात वन्य जीव संघटनेने उत्तर अटलांटिक महासागराचे उदाहरण दिले आहे. शास्त्रज्ञ म्हणतात की, १९७० ते २००२ च्या दरम्यान, पृथ्वीवरील जंगलाची टक्केवारी १२ टक्क्यांनी कमी झाली आहे. ताजा पाणी साठा ५५ टक्के कमी झाला आहे आणि सागरी जीवन एक तृतीयांश राहिले आहे. डब्ल्यूडब्ल्यूएफच्या अहवालानुसार, हे धोके मानवालाच नव्हे तर सस्तन प्राणी, पक्षी, मासे इ. ना देखील आहेत. गेल्या ३० वर्षांत या प्रजातींची संख्या निम्म्याहून कमी झाली आहे. या अहवालात, सरासरी अमेरिकी नागरिक इतर देशांच्या तुलनेत अनेक पट कार्बन उत्सर्जन करतात. जंगलांमधील झपाटयाने कमी होत चाललेली लोकसंख्या, जैविक वैविध्याचे जतन केलेल्या प्रवाळ प्रांतापैकी ४० टक्के संकुचित होणे असे प्रकार घडत आहेत. नद्या आणि तलावाच्या पाण्यात वाढ झाली आहे. जीवसृष्टीची प्रजाती नैसर्गिक दरांपेक्षा हजारपेक्षा जास्त वेगाने वेगाने वाढत आहे. औद्योगिकीकरण, नागरीकरणाचा विकास आणि कोळसा आणि पेट्रोलियमचा जास्त प्रमाणात वापर थांबवणे आवश्यक आहे. लोकसंख्या वाढ, बेसुमार पाणीवापर, जंगलांचा ऱ्हास, वृक्षतोड थांबवणे गरजेचे आहे. वातावरणातील ओझोनच्या थराला छीद्र पडले असून सूर्यप्रकाशातील अतिनील किरणे पृथ्वीवर पडत आहेत. त्यामुळे जमीन तापत आहे, हवा गरम होत असून वातावरणात गरमपणा निर्माण होत आहे. भारताने ग्रीनहाऊस गॅसच्या उत्सर्जनास स्वेच्छेने कमी करण्याचा निर्णय घेतला, परंतु अमेरिकेने यातून काढता पाय घेतला होता.हवामानातील बदलांचा सर्वात मोठा परिणाम गरीब देशांवर होऊ शकतो. मानव आणि सजीवांच्या जीवनावर हवामान बदलाचा परिणाम होतो. यामुळे विशिष्ट हंगामात राहणा-या वृक्षाना आणि जिवंत प्राण्यांना धोका आहे. हवामान बदलाचा धोका लक्षात घेवून प्रत्येक देशाने, नागरिकाने हवामान बदलाला कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टी टाळणे हितावह वाटते. जगातील अनेक देशांमध्ये कार्बनचे प्रमाण वाढत आहे. तसेच इ कचरा, जैविक कचरा, इमारतींच्या बांधकामाचा कचरा, प्लास्टिक कचरा नष्ट करणे आवश्यक आहे. फेरप्रक्रिया करून कचऱ्याची विल्हेवाट लावणे महत्वाचे आहे. हवेत कार्बन डाय ऑक्साईड, कार्बन मोनाक्साईडचे प्रमाण वाढत आहे. ऑक्सिजनची पटली कमी झाली आहे. ओझोनच्या थराला छिद्र पडून सूर्याची अतिनील किरणे पृथ्वीवर थेट पडत असल्याने पृथ्वीचे वातावरण गरम होत आहे. वाढत्या तापमानामुळे हिमनग वितळून नद्या,समुद्राची पातळी वाढत आहे. त्यामुळे समुद्रातील जलचर प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा बेसुमार वापर, मोबाईल, संगणकाचा वापर यामुळे हवेत किरणोत्सर्गाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वातावरणात उष्णता वाढत आहे. त्यामुळे तापमानवाढीचा मुद्दा जनतेपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लढवय्ये बाबा

लढवय्ये बाबा